कोल्हापूर : इचलकरंजी येथील कोरोना बाधित रुग्णांवर येथील कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल समितीने सोमवारी रात्री हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करून वेगळ्या सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले व माणूसपणाची भावना कृतीतून जपली.
घडले ते असे : इचलकरंजीतील एका व्यक्तीचा सीपीआर मध्ये मृत्यू झाला. काही काळात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नातेवाईक पूढे येईनात. इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते रवी जावळे यांनी काँग्रेस प्रदेश सचिव नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क साधून ही माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल समितीचे जाफरबाबा सय्यद यांनी तात्काळ तौफिक मुल्लाणी यांच्यासमवेत राजू नदाफ, जाफर मलबारी, जावेद सनदी,जाफर महात यांना तात्काळ पंचगंगा स्मशानभूमीत जाण्यास सांगितले. सीपीआर येथे मृतदेह शववाहिकेत घालण्यास दोन तास उशीर झाला. यावेळी समितीच्या दोन कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये येऊन शववाहिकेत मृतदेह ठेवला. त्यावेळी तिथे सुमारे ४० ते ५० नातेवाईक उपस्थित होते पण कोरोना भिती मुळे कोणीही पूढे येण्याचे धाडस करत नव्हते. स्मशानभूमीत राजू नदाफ,जाफर मलबारी व महानगरपालिकेचे दोन कर्मचारी अशा चौघांनी पीपीई कीट घालून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. मृताचा मुलगा भितीने जवळपास देखील गेला नाही अशावेळी कोल्हापूर जिल्हा बैतूलमाल समितीच्या सदस्यांनी धाडसाने अत्यंसंस्कार केले. रविवारी राजापूर येथील मुस्लिम बांधवाचा दफनविधी केला होता आणि सोमवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करीत शाहू महाराजांच्या पूरोगामी विचारांची जपणूक केली. कोरोनाचा काळात या समितीने केलेले कार्य बंधुभावाची वीण घट्ट करणारे आहे..