कोल्हापूर : जिल्ह्यातील सात लाखांवर नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली असून, हा वेग राज्यात चांगला मानला जातो. मात्र, लस घेतल्यानंतरही ५० नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लस घेतली म्हणजे कोरोनाविरोधात आपण विजय मिळवल्याची भावना न बाळगता काळजी घेण्याचीच गरज असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स, त्यानंतर पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी, नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशांना लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार १८ एप्रिलपर्यंत ७ लाख ३४ हजार ५३२ जणांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. मात्र, ही लस घेतल्यानंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली याची पाहणी केली असता हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ लसीकरणाचा कोरोनाची साथ रोखण्यात फायदाच होत असल्याचे चित्र आहे.
जानेवारी २०२१ पासून १८ एप्रिलपर्यंत ७१३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये लसीकरणानंतर ज्यांनी लस घेतली आहे, अशा शहर जिल्ह्यातील ५० जणांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील पाच जण असून उवरित ४५ जण हे बारा तालुक्यांतील आहेत. लसीकरण झालेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ५० जण पुन्हा पॉझिटिव्ह येणे ही अतिशय नगण्य अशी संख्या मानली जाते.
चौकट
लसीकरण करून घ्याच
जरी लसीकरणानंतर या काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरीही त्याची तीव्रता कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लसीकरणाचा त्यांना फायदाच झालेला आहे. परिणामी नागरिकांनी लस घेण्यामध्ये कुचराई करू नये. पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही आठवणीने घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
कोट
जिल्ह्यातील ५० जणांना जरी कोरोनाची फेरलागण झाली असली तरी लसीकरण झालेल्यांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. लस घेतली म्हणजे पुन्हा संसर्ग होत नाही, असा कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लस घेतली म्हणजे आपल्याला संचाराला स्वातंत्र्य आहे, असे समजू नये. लसीमुळे कोरोनाच्या संसर्गाची शक्यता खूपच कमी होते आणि तो झाला तरी त्यांची तीव्रताही कमी होते.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद, कोल्हापूर