खरेदी प्रकरणात नेमके चाललंय काय
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कोरोना काळातील खरेदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना याबाबत अजूनही ठोस कोणीच काही बोलायला तयार नाही. जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामध्ये अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी शुक्रवारी या औषध भांडाराला भेट दिली. तेव्हा ही कागदपत्रे जुळवाजुळव करण्याचे काम सुरू होते. यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी हे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी निंबाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे; मात्र पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र याबाबत आपले काहीही मत व्यक्त केलेले नाही. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काही पुरवठा आदेशांची माहिती मागवली असून, जादा किमतीने वस्तू पुरवल्या असल्यास जादाची रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला आहे.
भाजपने हा मुद्दा उचलून धरला असून, विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे आता या प्रकरणाचे गाभिर्य वाढले आहे.
१५०३२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेच्या औषध भांडारामध्ये अशा पद्धतीने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे.