बेळगाव : नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. कर्नाटक राज्य शासनाने आज गुरुवारी दुपारी जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार काल बुधवार 13 मे सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार 14 मे दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 22 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये 18 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 इतकी झाली आहे. यापैकी 35 जणांचा मृत्यू झाला असून 456 जण उपचारांती बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.नव्याने आढळून आलेल्या 22 कोरोना बाधित रुग्णांमध्ये बेंगलोर शहरातील 5 जणांसह मंड्या गदग व बिदर येथील प्रत्येकी 4, तसेच दावणगिरी येथील 3 आणि बेळगाव व बागलकोट येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.
बेळगाव येथे आढळलेली 27 वर्षीय पी - 974 क्रमांकाची महिला मुंबई (महाराष्ट्र) येथून बेळगावला आली आहे. बागलकोट येथील 23 वर्षीय पी - 977 क्रमांकाच्या पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बागलकोटला बेळगाव जिल्ह्यात जमेस धरले जात असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 109 इतकी वाढली आहे.