कोपार्डे : करवीर तालुक्यात सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु आहे. गत दीड महिन्यात तब्बल पाच हजार रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. करवीर तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाली. पण त्याची तीव्रता शेवटच्या आठवड्यात निर्माण झाली. २० एप्रिल ते २० मे या एक महिन्याच्या कालावधीत कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण ६ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. दररोज मृतांचा आकडा ८ ते ९ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात केवळ करवीर तालुक्यात पाच हजार कोरोना बाधित रुग्णसंख्या झाली आहे. करवीर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केंद्रांची अपुरी संख्या असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी बेड मिळवताना मनस्ताप व पळापळ करावी लागत आहे. शहरालगतच्या गावाबरोबर ग्रामीण भागातील कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
चौकट : सांगरुळ पॅटर्न राबवण्याची पुन्हा गरज
मागील वर्षी कोरोनाची लाट आल्यानंतर प्रशासनाने ग्रामपंचायत पातळीवर कोरोना ग्राम समिती नेमण्याचा निर्णय घेतला. या समितीला कडक लॉकडाऊन करण्यासाठी सर्व अधिकार देण्यात आले होते. करवीर तालुक्यातील सांगरूळ गावाने आपल्या सीमा बंद करण्याबरोबर गावात कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आखलेल्या विविध उपाय व त्याची कडक अंमलबजावणी याची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली होती. सध्या कोरोनाची वाढती संख्या पाहता सांगरुळ पॅटर्न पुन्हा राबवण्याची गरज आहे.
१ एप्रिलपासून करवीर तालुक्यातील दुसऱ्या लाटेचा लेखाजोखा
एकूण बाधित रुग्ण - ४ हजार ९७३
कोरोनाचे बळी -- १२५