कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून जिल्ह्यात २०० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष बजरंग पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. यापुढील काळात तातडीने ११० बेड करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी सांगितले.कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत या पाटील आणि चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतींनी या कालावधीमध्ये काय करायचे आहे याच्या सविस्तर लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ कसे घेता येईल आणि त्यांना मानधनही कशातून देता येईल, या सूचनांसह गृह अलगीकरण आणि संस्थात्मक विलगीकरण यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन बेडची मोठी गरज भासत असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. संजय घोडावत विद्यापीठामध्ये ६० ऑक्सिजन बेड उभारण्यात आलेले आहेत; तर आणखी ९० बेड उभारण्यात येत आहेत. पोर्ले तर्फ ठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असून, आणखी २० तयार करण्यात येणार आहेत.
एकलव्य पब्लिक स्कूल आणि संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे प्रत्येकी ५० बेड उभारण्यात येत आहेत. कागल येथील आरटीओ चेकपोस्टवरील गोदामामध्ये २० ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत; तर ३० बेड उभारण्यात येत आहेत. उर्वरित प्रत्येक तालुक्यात ५० ते १०० ऑक्सिजन बेड तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षतालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील कोव्हिड केअर सेंटरवरील रुग्णसंख्या, ऑक्सिजन बेडसंख्या, नव्याने दाखल झालेले रुग्ण, उपलब्ध ऑक्सिजन साठा, मागणी यांबाबतची माहिती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत दोन विभागप्रमुखांना समन्वय करणे बंधनकारक असून, दोन-तीन सत्रांमध्ये २४ तास हा नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. प्रत्येकी सत्रामध्ये दोन लिपिकांचीही नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाशेजारी हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.आता डॉक्टरांकडूनही घेतली जाणार रुग्णांची माहितीआता गावोगावी उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही गावातील रुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सभापती हंबीरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काही सदस्य प्रत्यक्ष, तर काही ऑनलाईन उपस्थित होते.
रोज संध्याकाळी गावात असणाऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधून ह्यइलीह्ण आणि ह्यसारीह्णचे त्यांच्याकडे तपासण्यासाठी जे रुग्ण आले होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांची पुन्हा एकदा तपासणी आणि माहिती संकलित केली जाणार आहे. या बैठकीला डॉ. योगेश साळे, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. फारूक देसाई उपस्थित होते.सातत्याने ऑक्सिजन पातळी तपासाग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गावातील सर्व घरांतील ग्रामस्थांची दिवसातून तीन वेळा ऑक्सिजन तपासणी करावी, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी केले आहे. अनेकदा ऑक्सिजन पातळी कमी झालेली असतानाही केवळ ती न कळल्यामुळे अनेकजण रोजची कामे करीत राहतात आणि अचानक ऑक्सिजन पातळी झपाट्याने खाली येते, जी धोकादायक असते.