कोल्हापूर : एकाच आठवड्यात बाप आणि लेकीचे निधन झाल्याने पारगावमधील शर्मा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कोरगावकर हायस्कूलमधील इतिहास, मराठीचे शिक्षक संजय शामराव शर्मा (५६ वर्षे) यांना कोरोनाने हिरावून नेले. त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याचा धक्का बसल्याने त्यांची विवाहित कन्या प्रज्ञा विशाल कांबळे (२७ वर्षे) यांचेही निधन झाले.शिक्षक संजय शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर रविवारी (दि. २३) त्यांना उपचारासाठी पारगावमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचा धक्का प्रज्ञा यांना बसल्याने त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. पुढील उपचारासाठी शर्मा यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांनी गुरूवारी (दि. २७) सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.
मूळचे पारगाव येथील असणारे शर्मा हे सध्या कोल्हापुरातील सदरबाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी मुक्तसैनिक वसाहतमधील वालावलकर हायस्कूलमध्ये काम केले आहे. ते गायन आणि सूरपेटीवादन चांगले करायचे. विद्यार्थीप्रिय होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.सहा महिन्यांचे बाळप्रज्ञा हिला सहा महिन्यांपूर्वी मुलगा झाला आहे. त्याच्यावरील आईचे छत्र आता हरपले आहे. बहिणीपाठोपाठ वडिलांचे निधन झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसल्याचे सांगताना बन्सी शर्मा यांना अश्रू अनावर झाले.