कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेली रुग्णसंख्या ३ हजार असून उर्वरीत ४५० मृत्यू हे अन्य राज्य व जिल्ह्यातील आहेत. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर २.९० टक्के इतका असून तो अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशात आणि राज्यात जास्त आहे हे खरे नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
चाचण्या वाढवल्याने पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही वाढत आहे त्याची नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही, असा दिलासाही त्यांनी दिला. जिल्ह्याचा सध्याचा मृत्यूदर २.९० टक्के असून तो पंजाब, हरयाणासारख्या अन्य राज्यांच्या व मुंबई, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, उस्मानाबाद अशा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेतदेखील कमी आहे.गेल्या महिन्याभरापासून सातत्याने कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर देशात जास्त असल्याचे म्हटले जात आहे हा गैरसमज असून अन्य जिल्ह्याच्या तुलनेत येथील मृत्यूदर खूप कमी आहे, हे समजावे यासाठी त्यांनी जिल्ह्याची कोरोना सद्यस्थिती सांगितली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोल्हापुरात उपचारासाठी अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या मोठी असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर जास्त दिसत आहे. जिल्ह्यात ६० वर्षांवरील मृत्यू ५३ टक्के असून त्यापैकी ८० टक्के लोकांना एकही लस घेतलेली नाही.
४० टक्के लोक उपचारासाठी उशिरा दाखल झाले. तर ४५ वर्षांवरील २० टक्के लोक व्याधीग्रस्त होते. डेथ ऑडिटनुसार ४० टक्के लोकांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यापासून ३ दिवसात झाला आहे, याचा अर्थ गंभीर स्थिती निर्माण झाल्यावरच ते उपचारासाठी आले आहेत.मृत्यूदरबाधितांच्या संख्येवरून ठरवला जातो, तो लोकसंख्येचा आधारावर काढला तर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख आहे, त्यानुसार १० लाख लोकांमागे ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांचे प्रमाण २४ हजार इतके आहे. डेथ ऑडिटसाठी जिल्हा टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्या त्या तालुक्यांसाठी समिती नियुक्त करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.लस ६० वर्षांवरील व व्याधीग्रस्तांसाठीचमृत्यूदर कमी करण्यासाठी महाआयुष अंतर्गत ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचा सर्वेक्षण करण्यात येत असून त्यांची तपासणी, ६ मिनिटं वॉक टेस्ट, लसीकरण याची माहिती घेतली जात आहे. या नागरिकांचेच लसीकरण आधी पूर्ण केले जाणार आहे. सध्या ६० वर्षांवरील नागरिकांचे ८० टक्के तर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे ६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, आठवड्याभरात ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न असेल.रोज १२ हजार चाचण्याजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोजच्या बाधीतांची संख्या २ हजार इतकी येत आहे. २० तारखेला जिल्ह्यात रोज ५ हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता ही संख्या ११ ते १२ हजारांवर गेली आहे. यामुळे लक्षणे नसलेल्या सुपर स्प्रेडरना शोधणे शक्य झाले आहे. यातील ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, उर्वरीत ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या २० टक्के लोकांवर जास्त लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे हा यामागचा उद्देश आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.१० लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण (२४ मे)जिल्हा मृत्यू
- मुंबई : १ हजार १२३.४७
- नागपूर : १ हजार २१४.३
- पुणे : १ हजार ४७.७
- सातारा : ८५८.५
- सांगली : ८७७.४
- रायगड : ८५०.५
- ठाणे : ७६८.६
- सिंधुदुर्ग : ६५४.७
- उस्मानाबाद : ६८२
- कोल्हापूर : ६७४.९
राज्यांचा मृत्यूदर (२५ मे)
- महाराष्ट्र : ३.१
- पंजाब : ४.८
- उत्तर प्रदेश : ३.०
- झारखंड : २.४
- मध्य प्रदेश : २.३
- हिमाचल प्रदेश : २.३
- हरयाणा : २.२