कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसात जप्त केलेली सुमारे २५७२ वाहने ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच मालकांना परत देण्यात येणार आहे. सद्या लॉकडॉऊन येत्या मंगळवारपर्यत असला तरीही ‘कोरोना’ची व्याप्ती पहाता लॉकडाऊन स्थिती एप्रिल अखेरपर्यत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जप्त केलेली वाहने परत मिळण्यासाठी मालकांना दिर्घ प्रतिक्षा करावी लागणार आहे.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बिनकामी रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी जप्तीची कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ला प्रारंभ झाला, त्या दिवसापासून जिल्ह्यात विवीध ठिकाणी कारवाई करत सुमारे २५७२ वाहने जप्त केली. यामध्ये ६ रिक्षा व चार चारचाकी वाहनांचा समावेश आहे. आता लॉकडाऊन संपल्यानंतरच ही वाहने मालकांच्या हाती मिळणार आहेत.
पहिल्या टप्प्यात जाहीर केलेले लॉकडाऊन हे दि. १४ एप्रिल रोजी संपणार आहे. पण राज्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची व्याप्ती पहाता हे लॉकडाऊन एप्रिल अखेरपर्यत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जप्त केलेली वाहने संबधीत मालकांना लॉकडाऊन स्थिती संपल्यानंतरच हाती मिळणार आहेत. त्यासाठी वाहन मालकांना त्या वाहनांची कागदपत्रे हजर करावी लागणार आहेत.लॉकडाऊन’च्या कालावधीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३५८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २५७२ वाहने जप्त केली. उर्वरित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याद्वारे सुमारे १३ लाख ७७ हजार १०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदी आदेशाचे उल्लघन करणाºया १६८७ जणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.