गांधीनगर : गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी गांधीनगर व्यापारी पेठ कोरोना महामारी संसर्गामुळे बंद असल्याने येथील व्यापारी, कामगार वर्ग, तसेच ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक, हमाल, वाहन चालक, मालक, हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंता पसरली आहे.
व्यापारी पेठेतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर व्यवसाय बंद असल्यामुळे येथील कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांना दुकानाचे भाडेही भरणे मुश्कील झाले आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट, तर दुसरीकडे दुकाने बंद ठेवून सुरू असलेला खर्च यामुळे येथील व्यापारी वर्ग चिंतातुर बनला आहे. गांधीनगरची कापड व्यापार पेठ ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, आणि कोकण परिसरात घाऊक विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. होलसेल व रिटेल अशी मिळून साडेतीन ते चार हजार दुकाने आहेत. पाच गावच्या हद्दीत ही व्यापारी पेठ विस्तारित झाली आहे. या व्यापारी पेठेवर जवळपास 15 ते 20 हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. ऐन सणासुदीच्या काळात व लग्नसराईत, कोरोना महामारी संसर्गामुळे प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्याने व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. कर्जे काढून सुरू केलेला व्यवसाय या महामारीच्या संकटामुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना सतावत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी होईल आणि दुकाने सुरू होतील या आशेवर हे दुकानदार दिवस मोजत आहेत; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या संपूर्ण राज्यात लक्षणीय झाल्याने सध्या तरी दुकाने उघडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आणखी किती दिवस व्यवसाय बंद करून डोक्यावर कर्ज वाढवून घ्यायचे, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
कोट : कोरोना महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेला लाॅकडाऊनचा निर्णय व्यापारी, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक, चालक-मालक, हमाल, माथाडी कामगार यांच्या जिवावर उठत आहे. सर्व ट्रान्स्पोर्ट मालक व व्यापारी नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास तयार आहेत. त्यामुळे प्रशासनाने नियम थोडे शिथिल करून व वेळेचे बंधन घालून तरी सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
चंद्रकांत पाटील-अध्यक्ष गांधीनगर गुड्स मोटर मालक संघ
कोट : केंद्र व महाराष्ट्र शासनाने व्यापारी वर्गाला कर सवलती, तसेच व्यवसाय उभे करण्यास घेतलेल्या कर्जात सवलती देऊन व्यापार वाढीस चालना देण्याची गरज आहे.
रमेश वाच्छानी, गांधीनगर कापड व्यापारी
कोट :3 गांधीनगर व्यापारीपेठ कोरोना संकटामुळे बंद आहे. व्यापारी पेठेवर उदरनिर्वाह चालवीत असणाऱ्या कामगार वर्गाचे अतोनात हाल होत आहेत. पंचवीस ते तीस वर्षांपासून येथे काम करणारा कामगार वर्ग आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गानेही कामगारांना सहानुभूती दाखवावी, तसेच गोरगरीब कामगारांच्या कुटुंबांचा विचार करून प्रशासनाने व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी.
बाळासाहेब कांबळे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना गांधीनगर