कोल्हापूर : पावसाळा आल्यामुळे कोरोनाबरोबरच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजारांचा फैलावही शहर आणि जिल्ह्यात होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क राहून जागृती करीत आहे. नागरिकांनीही थंड, ताप आल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन महिन्यांपासून कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. यामुळे शासकीय आरोग्य प्रशासन मेटाकुटीस आले आहे. अशातच पावसाळा तोंडावर आल्याने इतर साथीचे आजार पाय पसरत आहेत. शहर आणि खेड्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजाराचे रुग्ण् सापडत आहेत. कोरोना आजाराचीही लक्षणे थंड, तापच आहे. इतर साथीच्या आजराची लक्षणे हीच आहेत. यामुळे रुग्णांनी अनाठायी भीती न बाळगता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.
चौकट
साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजाराचा प्रसार होतो. यंदाही तो होत आहे; पण यंदा साथीच्या आजारांसोबत कोरोनाही आहे. त्यामुळे प्रत्येकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या साथीच्या आजारापासून दूर राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. वैयक्तिक स्वच्छता राखत डासांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा. घरात डासांची अळी होऊ नये, यासाठी जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये. एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
डबक्यांमध्ये गप्पी मासे
डबक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी तिथे गप्पी मासे सोडले जातात. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात गप्पी मासे मोफत उपलब्ध करून दिले जाते. एकदा गप्पी मासे डबक्यात सोडल्यानंतर त्या डबक्यात डासांची निर्मिती होत नाही, असा आरोग्य प्रशासनाचा दावा आहे. या शिवाय डबक्यात झालेले डास नष्ट करण्यासाठी जळके ऑईलही टाकण्याचा सल्ला दिला जातो.
कोट
पावसाळ्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजारांचीही लागण होते. यामुळे प्रत्येक नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. थंड, ताप, अंगदुखी असल्यास तपासणी करून घ्यावी. डासांपासून बचाव करून घ्यावा. परिसराची स्वच्छता राखावे.
डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी
वर्षे डेंग्यू सॅम्पल पॉझिटिव्ह मलेरिया सॅम्पल पॉझिटिव्ह चिकुनगुनिया सॅम्पल पॉझिटिव्ह
२०१७ १५८८ ३९४ ७९ ७८ २० १०
२०१८ ५३८५ १९९१ २४ २४ ४३ ४३
२०१९ ७९७३ २००२ २७ १७ ३५९ २४९
२०२० १६५८ ३९३ १५ ८ २२३ २५४
२०२१ मे वर्षे २०६ ३१ १ १ ८७ ४३