इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून आलेले ५० हजारांचे अनुदान सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे लाभार्थींपर्यंत पोहोचलेले नाही. रुग्णांशी निगडित कागदपत्रे न दिसणे, अर्जदाराचे मृत व्यक्तीशी असलेले नाते, चुकीची माहिती भरली गेली असेल दुरुस्ती न होणे अशा त्रुटी आल्या असून त्या शासनाला कळविण्यात आल्या आहेत, त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती होऊन प्रत्यक्ष अनुदान खात्यावर जमा व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मदत देण्याचे काम ठप्प झाले असून, हे पैसे मिळणे म्हणजे नातेवाइकांना नवी डोकेदुखी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ५१९१ तर इतर जिल्ह्यातील ६०७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.गेल्या पावणेदोन वर्षात कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या वतीने ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यासाठीची लिंक चार दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मृताच्या नातेवाइकांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन केले होते. त्या लिंकवर नातेवाइकांनी माहिती भरल्यानंतर त्याची सीपीआरकडून पडताळणी केली जाते. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींची यादी तयारच आहे, त्यामुळे ही पडताळणी झाली तशी यादी जिल्हा प्रशासनाकडे येते. जिल्हा प्रशासनाकडून ते अप्रूव्ह झाले की, संबंधितांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.त्यानुसार गेल्या चार दिवसांत सीपीआरच्या यंत्रणेने ९० जणांच्या अर्जांना मंजुरी दिली होती. ती जिल्हा प्रशासनाकडे आल्यानंतर प्रत्यक्षात सॉफ्टवेअरवर ३४ अर्जच आले आहेत. अर्जावर युजर आयडी आणि पासवर्ड एकाचा आणि नाव दुसऱ्याचेच येत आहे. नामंजूर केलेले अर्जदेखील पुढे अप्रुव्ह होण्यासाठी आले आहेत. अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे जिल्हा प्रशासनाला अनुदान वाटपाचे काम सुरू होण्याआधीच थांबवावे लागले आहे. प्रशासनाने शासनाला कोणकोणत्या प्रकारच्या त्रुटी आल्या आहेत, याची यादीच शुक्रवारी पाठवली आहे. त्यात दुरुस्ती करून आल्याशिवाय अनुदान वाटप करता येणार नाही.
अडचणी काय आहेत
मृत व्यक्तींच्या एकापेक्षा अधिक नातेवाइकांनी अनुदानासाठी अर्ज केला असेल तर नेमकी कोणाच्या खात्यावर रक्कम वर्ग करायची, अर्ज केलेली व्यक्ती तीच आहे, खरेच मृताचे नातेवाईक आहेत का, खाते क्रमांक त्याच व्यक्तीचा आहे की अन्य व्यक्तीचा आहे. अन्य जिल्ह्यातील व्यक्तीने त्यांच्या मूळ जिल्ह्यात व कोल्हापुरातही अर्ज केल्यास कसे करणार असे प्रश्न आहेत. या सगळ्याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावणे गरजेचे आहे. सध्या ही प्रक्रिया फक्त ऑनलाइन आहे. प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी करून गृहभेटीद्वारे त्याची सत्य-असत्यता पुन्हा तपासून पाहणे गरजेचे आहे.
या आहेत अडचणी-रुग्णांशी निगडित कागदपत्रे न दिसणे-जिल्हा शल्यचिकित्सांकडे आलेल्या अर्जात तपशील न येणे-चुकीची माहिती भरली तरी ते स्वीकारले जाणे-एका व्यक्तीसाठी अनेकांचे अर्ज-दुरुस्ती करता न येणे-अनुदान मंजूर-नामंजूर केलेली यादी न दिसणे
कोल्हापूरची यादी तयार...कोरोना सुरू झाल्यापासून सीपीआर आणि जिल्हा प्रशासनानेदेखील यासंबंधीची सगळी माहिती अपडेट ठेवली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांची यादी तयार आहे. फक्त पडताळणी करून खात्यावर रक्कम वर्ग करणे एवढेच बाकी आहे. या कामाची राज्य पातळीवरदेखील दखल घेतली गेली. त्यामुळे अनुदान मिळताच ते तातडीने वर्ग करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची इच्छा होती. त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र माणसे नेमून काम सुरू केले; पण सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे ते थांबवावे लागले.
कोरोना मृतांच्या नातेवाइकांना अनुदान वाटप करण्यासाठी आलेल्या लिंकमध्ये व सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्या आम्ही शासनाला कळवल्या असून, ते दुरुस्त होऊन आले की, अनुदान खात्यावर वर्ग केले जाईल. -शंकरराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी