कूर (ता. भुदरगड) येथील ट्रक व्यावसायिक म्हणून परिचित असणारे धनाजी बाजीराव देसाई (वय ४८) यांचे कोरोनाने शुक्रवारी (दि. १८) रोजी निधन झाले, तर त्यांचा कोरोनाबाधित भाऊ नेताजी बाजीराव देसाई (वय ४४) यांचे दोन दिवस अगोदर बुधवारी (दि. १६) रोजी पहाटे निधन झाले. विशेष म्हणजे या दोघांचे वडील बाजीराव देसाई (वय ८५) जे गेले ४ ते ५वर्ष आजारी असल्याने अंथरुणावर खिळून होते. त्यांचे शुक्रवारी (दि. ११) रोजी निधन झाले. चार-पाच दिवसाच्या अंतराने घरातील दोन कर्त्या भावांचा अकाली व वडिलांच्या निधनाने देसाई कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात या घटनेबाबत हळवळ व्यक्त होत आहे.
कूर गावापासून दोन ते अडीच किलोमीटरवर देसाई कुटुंबांची शेती आहे. संपूर्ण कुटुंब शेतात राहायला असल्याने त्यांचा गावाशी संपर्क कमी, पण अचानक कोठून तरी कोरोनाचा शिरकाव झाला. घरातील नऊजणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, भावजय, चुलते हे सर्वजण दवाखान्यात उपचार घेऊन कोरोनावर मात करून घरी परतले आहेत; परंतु शुक्रवारी (दि. ११) जून रोजी
आजारी असलेल्या बाजीराव देसाई यांचा कोरोनाने मृत्यू झाला. एव्हाना संपूर्ण घराला कोरोनाची लागण झालेली होती. धनाजी आणि नेताजी या दोघा भावांची वडिलांच्या रक्षाविसर्जनादिवशीच तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना एक दिवसाच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घरातील नऊजणांवर गारगोटी येथे उपचार चालू होते.