जयसिंगपूर : कोरोनामुळे सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद होते. सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळातील घरगुती कर, व्यावसायिक कर माफ करावा, अशा मागणीचे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी टिना गवळी यांना देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोना महामारीमध्ये २०१९-२० व २०२०-२१ या सालामध्ये कोरोना काळात सहा ते सात महिने दुकाने व इतर व्यवसाय, उद्योगधंदे पूर्णपणे बंद होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे अवघड बनले आहे. १८० दिवस पूर्णत: बंद असणाऱ्या व्यावसायिकांना व्यावसायिक कर व घरगुती कर आकारणी माफ करण्यात यावी. पालिका सभेसमोर हा विषय ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने ते माफ करावेत. सातारा नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पालिकेनेही घरफाळा, व्यावसायिक करमाफीचा प्रस्ताव तयार करून कर आकारणीतून सूट देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनावर शैलेश आडके, बजरंग खामकर, चंद्रकांत जाधव, शैलेश चौगुले, शीतल गतारे, बाळासाहेब वगरे, गणेश गायकवाड, पराग पाटील, शंकर नाळे, सागर मादनाईक, संजय मादनाईक, अमित मगदूम, अर्चना भोजने, स्वप्नील शहा, सचिन भोसले, प्रेमजित पाटील, प्रशांत मादनाईक, वासुदेव भोजणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी टिना गवळी यांना निवेदन देण्यात आले.