कुरुंदवाड : कोरोनामुळे गेली सहा ते सात महिने शहरातील विविध आस्थापना, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले असून नगरपरिषद अधिनियमांनुसार बंद काळातील व्यावसायिक कर आणि घरफाळा माफ करण्याची मागणी शहर व्यापारी संघटना आणि सर्वपक्षिय कृती समितीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी जाधव यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचे आश्वासन कृती समितीला दिले.
कोरोना संसर्गामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांत शहरातील विविध आस्थापना, व्यवसाय, उद्योगधंदे पूर्णपणे बंद असल्याने व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद अधिनियमांप्रमाणे व्यवसाय कर आणि घरफाळा माफ करण्याची तरतूद असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शहरातील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी अभय पाटुकले, नगरसेवक उदय डांगे, दयानंद मालवेकर यांच्यासह शहरातील व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.