लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गतवर्षी कोरोनाने सारे जग हैराण झालेले असताना या संसर्गाला वाकुल्या दाखवत कोल्हापूर शहरात १ हजार ३४६ लग्नांचा बार उडाला आहे. सन २०१९ च्या तुलनेत ही आकडेवारी कमी दिसत असली तरी ही केवळ महापालिकेकडे झालेली नोंदणी व विवाह नोंदणी कार्यालयाकडील विवाहांची आहे. परवानगी न घेता परस्पर झालेले, तसेच नोंदणी न झालेल्या विवाहांची संख्या याहून मोठी आहे.
विवाह समारंभ हा प्रत्येक कुटुंबासाठी आनंददायी सोहळा असला तरी गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला आणि या सोहळ्यांवर राज्य शासनाने बंदी आणली. शेकडो, हजारो नागरिकांच्या हस्ते वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायची पद्धत असताना केवळ ५० लाेकांच्या उपस्थितीत वधू-वरांची सप्तपदी पार पाडावी लागली. त्यासाठीही आधी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक होते, मंगल कार्यालयांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांसाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, मास्क, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग असे नियम लावण्यात आले होते. जास्त व्यक्ती उपस्थित असलेल्या, नियमांचे पालन न केलेल्या यजमान कुटूंबावर, मंगल कार्यालयांवरही गुन्हे दाखल झाले. असे सगळे झाले असले तरी काही ठिकाणी कोरोनाचे नियम पाळत काही ठिकाणी नियमांना धाब्यावर बसवून विवाह सोहळे पार पडले.
--
वर्षभरात ४९ लग्नतिथी
हिंदू पंचांगानुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि दिवाळीनंतर लग्नाचा बार उडतो. सगळ्यांना या कालावधीत सुट्ट्या असल्याने या कालावधीतील मुहूर्तांना अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र उन्हाळ्याची सुरुवात झाली तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरू झाल्याने अनेकांनी हा समारंभ पुढे ढकलला. गतवर्षी विवाहाचे ४९ मुहूर्त होते. याशिवाय काढीव मुहूर्तावरदेखील विवाह केले जातात.
--
२४२ जणांचे रजिस्टर्ड शुभमंगल
कोल्हापुरातील भवानी मंडप परिसरात नोंदणी विवाह कार्यालय आहे. येथे आधी एक महिना नोंद केल्यास वधू-वरांचे नोंदणी पद्धतीने विवाह केले जातात. २०१९ साली अशा पद्धतीने विवाह झालेल्यांची संख्या ३११ होती, तर गतवर्षी कोरोनाची लाट असताना २४२ जणांनी लग्नाच्या डामडौलात न पडता नोंदणी विवाह केले.
--
एप्रिल कठीणच
या एप्रिल महिन्यात २२, २४, २५, २६, २८, २९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यात ६०० हून अधिक विवाह झाले आहेत. पुढील मे महिन्यात सर्वाधिक १६ विवाह मुहूर्त आहेत.
--
गेल्यावर्षी आणि आतासुद्धा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कार्यालयामध्ये विवाह समारंभ झाले आहेत. ज्यांना ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करायचा नाही, त्यांनी बुकींग रद्द करून पैसे परत नेले. गेल्या वर्षभराचा काळ विवाहांवर अवलंबून असलेली मंगल कार्यालये, बँडवाले, सजावटवाले या सगळ्यांसाठीच कठीण होता. अजूनही संसर्ग वाढत असल्याने येणारा काळही परीक्षा घेणाराच असणार आहे.
नाना जरग
कृष्णसरस्वती मंगल कार्यालय
--