कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च बँक देणार आहे. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागे हिमालयासारखे राहू, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.बँकेचे कर्मचारी संजय पाटील (टाकळी), अशोक पाटील (हडलगे), पांडुरंग शेंडगे (कुंभोज), प्रशांत नाईक, (कागल) यांचा कोरोना महामारीमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबांच्या मागे जिल्हा बँक उभी आहे.यापूर्वीच बँकेने दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना दहा लाख रुपये एलआयसीकडून विमाकवच घेतले आहे. तसेच बँकेने नफ्यातून पाच लाख रुपये व ईडीएलआय योजनेतून ( एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम) सहा लाख रुपये असे एकूण २१ लाख रुपये कुटुंबीयांना मिळण्याची व्यवस्था केलेली आहेच. त्याशिवाय, अनुकंपा तत्त्वावर लवकरच त्यांच्या वारसांस सेवेत रुजू करून घेण्याचे यापूर्वीच एकमताने ठरवले आहे.
यापुढे फक्त जे या महामारीने आजारी पडतील, त्यांना दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी बँकेच्या कल्याण मंडळाकडून दोन लाख रुपयेपर्यंत दवाखान्याच्या खर्चासाठी विमा दिला जाणार आहे. हा विषय तसेच या महामारीने आजारी पडून बरे होऊन घरी परतले आहेत व दवाखान्याचा खर्च स्वतः भागवला आहे, त्यांना बँकेच्या वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेमधून दोन लाखापर्यंतचा योग्य खर्च देण्याचा विषय आजच्या विषयपत्रिकेवर आहे. त्यास संचालकांनी मान्यता द्यावी, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयातून केले आहे.