कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग संथ गतीने कमी होत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर असताना तिसरी लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलून येत असल्याचे संसर्गही झपाट्याने होत आहे. म्हणूनच कोरोना अद्याप गेलेला नाही, त्यामुळे मागे झालेल्या चुका पुन्हा केल्या तर तिसरी लाटदेखील अटळ आहे.
कोरोनापासून बचाव करण्याकरिता राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांनी आपले काही कर्तव्य, सामाजिक जाणीव ठेवणे आवश्यक आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ याची भान ठेवले पाहिजे. कोरोना लागण झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेला दोष देण्यापेक्षा तो होणारच नाही याची खबरदारी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
या चुका पुन्हा करू नका -
१. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळा - अनलॉक झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी उदा. भाजी मंडई, व्यापारपेठ, मैदाने, उद्याने येथे गर्दी केली जाते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा पार फज्जा उडतो. खरेदी करताना दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून उभे राहा. विशेषत: भाजी मंडईत वावरताना खबरदारी घ्या.
२. स्वत:चे आजारपण लपवू नका - अनेक व्यक्ती केवळ भीतीपाेटी स्वत:चे आजारपण लपवताना दिसतात. आजारी असतानाही घरीत थांबून राहतात. लवकर उपचार घेत नाहीत. सर्दी, खोकला, ताप, कणकणी, अंगदुखी यासारखी लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
३. कोरोना चाचणी तत्काळ करून घ्या - कोरोनासदृश लक्षणे असूनही अनेक व्यक्ती या कोरोनाची चाचणी करून घेण्यास घाबरतात. परंतु असे करणे किती महागात पडते याचा अनुभव अनेकांना आला आहे. तेव्हा संकोच न करता त्वरित कोरोना चाचणी करून घेण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
४. गृह अलगीकरणाचा हट्ट सोडावा - दुसऱ्या लाटेवेळी गृह अलगीकरणात राहून कोरोना रुग्णांनी उपचार घेतले, पण ते कुटुंबांच्या दृष्टीने घातक ठरले. घरात असताना काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी होत नाही. कोरोनाबाधिताचा संपर्क काही ना काही कारणाने येतोच. त्यामुळे घराबाहेर राहून उपचार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
५. मास्क आणि सॅनिटायझर वापर अनिवार्य - कोरोना संपला म्हणून मास्कचा वापर न करणे, घरी अथवा कार्यालयात गेल्यावर सॅनिटायझर अथवा साबणाने हात न धुणे कोरोना संसर्गाला निमंत्रण देणारे आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून वारंवार हात सॅनिटायझरने धुवावेत, मास्कचा नियमित वापर करावा.
- पहिला अनलॉक
(दि. ४ ऑगस्ट २०२०)
एकूण कोरोना रुग्ण - ७७१४
बरे झालेले - ३४४९
मृत्यू - २१७
- दुसरा अनलॉक
(दि. १ जून २०२१)
एकूण कोरोना रुग्ण - १ लाख १४ हजार ६६४
बरे झालेले - ९५ हजार ०७१
मृत्यू - ३७५७
१० पथकांची असेल नजर -
अनलॉकनंतर शहरात दुकाने आणि गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने दहा पथके स्थापन केली असून त्यामध्ये केएमटी, महापालिकेच्या प्रत्येकी चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय परवाना विभागाचे एक पथक कार्यरत आहे. त्यामध्ये सहा ते सात कर्मचारी आहेत. कडक निर्बंध असलेल्या काळात दुकानदारांकडून जर का नियमांचे उल्लंघन झाले तर दंडात्मक कारवाईसह दुकाने सील करण्याची कारवाई केली जात आहे.