कोल्हापूर : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा पती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोरील कागलकर हाऊसमधील संबंधित कार्यालय बंद करण्यात आले असून, सोमवारी सकाळी दहापासून सर्व विभागांमध्ये अभ्यांगतांना येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.कागलकर हाऊस येथील पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे कार्यालय आहे. पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवार, रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील विविध विभागांतील कर्मचारी कामावर आले. मात्र, ग्रामसडक योजना विभागातील एका महिला कर्मचाऱ्यांच्या पतीचा रविवारी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे समजले. त्यांनतर संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली.
संबंधित महिला कर्मचारी आपल्या विभागात आल्या होत्या का? त्या कोणाच्या संपर्कात आल्या आहेत का? याची चौकशी प्रशासनाच्या वतीने दिवसभर सुरू होती. त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे अलगीकरण करण्यात आले असून, संबंधित महिला कर्मचाऱ्याचा स्राव घेण्यात आला आहे. या अहवालाकडे संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सकाळी कार्यालयात आल्यानंतर आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची चर्चा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची घबराट होती.