लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव: आजही वडगावात कोरोनाच्या संख्येत पाच रुग्णांची वाढ झाली आहे.
त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या ५६ झाली आहे. अनेक रुग्ण कॉन्टक्ट ट्रेसिंग देत नसल्यामुळे रुग्णात वाढ होत आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसाय व रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले.
शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. पालिकेच्यावतीने ध्वनीफित लावून प्रबोधन करत आहेत, तसेच पालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन करत आहेत. तर पोलीस प्रशासनाने प्रमुख चौकात बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, याबाबत आवाहन करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी १२ वाजता वडगावसह परिसरामध्ये पोलिसांनी पथसंचलन केले. पोलिसांनी मास्क लावून, सामाजिक अंतर ठेवून परिसरामध्ये संचलन केले. "कोरोनाची व्याप्ती गांभीर्याने लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच विनाकारण सतत रस्त्यावर येऊ नये." असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात बँका,व्यापारी, शिक्षक आदी सेवा क्षेत्रातील नागरिकांच्यावर कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. घरातील तीन चार जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात अनेकांनी धास्ती घेतली आहे, तर काही जण बेदरकार विना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग असे नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे ठळक चित्र दिसत आहे.
1.चौकट: उद्या, शुक्रवारपासून धान्य, किराणा असोसिएशनने सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी विजय झगडे यांनी दिली.
□ फोटो ओळ : पेठवडगाव: येथे पद्मा रोडवर वडगाव पोलिसांनी पथसंचलन करून नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले.यावेळी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक नासीर खान आदी उपस्थित होते.(छाया.संतोष माळवदे)