कोल्हापूर : कोरोना जिल्ह्यातून हद्दपारच्या उंबरठ्यावर असून, कोविड रुग्णालयात फक्त ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर लक्षणे नसणारे सुमारे ६१८ कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण ९८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत ४६ नवे रुग्ण वाढले, तर हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील २७ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक सुखावला असला तरीही कोरोनाची भीती अद्याप नागरिकांच्या मनातून कमी झालेली नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांनी पूर्वीप्रमाणे गजबजलेल्या दिसत असल्या तरीही प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसत आहे. मास्क नसणाऱ्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे.|गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नव्या ४६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये कोल्हापूर शहरात १०, करवीर तालुक्यात ७, शिरोळ व हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी ५, शाहूवाडी व चंदगड तालुक्यात प्रत्येकी ३, तर गगनबावडा तालुक्यात एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८,१८९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात ३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या ४५,५६४ वर पोहोचली आहे.
त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण ९८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ३६४ रुग्णांवर विविध कोरोना रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शिवाय ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील ११४ रुग्ण व कोल्हापूर शहरातील ५०४ रुग्ण लक्षणे नसल्याने घरीच राहून उपचार घेत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या १६४३ वर पोहोचली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी :
आजरा - ८४५, भुदरगड-१२०८, चंदगड-११७२, गडहिंग्लज-१४०६, गगनबावडा-१४२, हातकणंगले-५२३३, कागल-१६३८, करवीर-५५४७, पन्हाळा-१८३७, राधानगरी-१२१३, शाहूवाडी-१३२३, शिरोळ-२४५९, नगरपालिका-१३४३, कोल्हापूर शहर-१४६०४, इतर जिल्हा/राज्य-२२१९. (एकूण रुग्ण-४८१८९, मृत्यू-१६४३)