कोल्हापूर : पहिल्या तसेच दुसऱ्या लाटेवेळी संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या तसेच संपूर्ण समाजजीवनाची घडी विस्कटणाऱ्या कोरोना संसर्गाने आता नांगी टाकली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पन्नासच्या आतच नवीन रुग्णांची भर पडत आहे. रविवारी केवळ ३५ नवीन रुग्णांची नोंद झाली तर कोल्हापूर शहरातील एका महिलेचा कोराेनामुळे मृत्यू झाला.
सीपीआर रुग्णालय प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात केवळ ३५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील चार रुग्णांचा, इतर जिल्ह्यातील पाच, हातकणंगले तसेच करवीर तालुक्यातील प्रत्येकी तीन, तर शाहूवाडी तालुक्यातील दोन रुग्णांचा रुग्णांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील संभाजीनगर येथे राहणाऱ्या ६१ वर्षीय महिलेचा रविवारी कोरोनामुळे सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत उपचार घेणारे ६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
गेल्या काही दिवसांतील नवीन रुग्णांचे आकडे पाहता कोरोनाने जिल्ह्यात मान टाकली असल्याचे दिसते. नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो.