कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे आकडे सलग चौथ्या दिवशी कमी आल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण अजूनही मृत्यूदर जैसे थे असल्याने चिंतेचे वातावरण आहे. रविवारी १०६६ नवे कोरोनाबाधित आढळले तर ३६ जणांनी जीव गमावला. यातील एक बेळगाव जिल्ह्यातील आहे, उर्वरित ३५ मृत्यू हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी विशेेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या महिन्याभरात प्रथमच १० हजार १८६ पर्यंत खाली आली आल्याने चौथ्या टप्प्यात असलेल्या कोल्हापूरला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही साडेतेरा टक्केवर आहे, तो दहा टक्केच्या आत आला तर लॉकडाऊनमधून थोडासा दिलासा मिळणार आहे. गेल्या चार दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी कमी होत चालली असून बाधितांचा आकडा बऱ्याच दिवसांनी दीड हजाराच्या आत आला आहे.
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाचपर्यंत ६ हजार १२७ ॲन्टिजन टेस्ट झाल्या, त्यातील ५ हजार ६२४ अहवाल निगेटीव्ह आले तर ६७४ अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले. आरटीपीसीआरसाठी २ हजार ५२७ स्वॅब संकलीत झाली, त्यातील २ हजार २८५ अहवाल निगेटिव्ह आले. २३१ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी दवाखान्यात १०१९ स्वॅब तपासणीला घेतले, त्यातील ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले.
तालुकानिहाय मृत्यू
कोल्हापूर शहर: १० राजारामपुरी, दौलतनगर, आरकेनगर, गंगावेश, शुक्रवार पेठ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, बोंद्रेनगर, कनाननगर, शाहू मिल,
करवीर: ७ बाचणी, शिंगणापूर, कावणे, कोपार्डे, केर्ली, कणेरीमठ, मोरेवाडी
राधानगरी: २ यळवडे, मजरे कासारवाडे,
हातकणंगले: ४ रांगाेळी, हेर्ले, तळसंदे, चावरे,
कागल : २ माद्याळ, मुरगुड,
गडहिग्लज : २ आत्याळ, भडगाव,
आजरा : २ धामणे, भातवाडी,
पन्हाळा : ४ जोतिबा, पडळ, पोर्ले, पडळ,
भूदरगड : १ कलनाकवाडी,
चौकट
मृत्यू रोखण्यात शिरोळ आघाडीवर
शिरोळ तालुक्यात गेल्या महिन्याभरात मृत्यूने उच्चांक गाठला होता, पण रविवारी आलेल्या अहवालामध्ये तालुक्यात नव्याने ६५ रुग्ण आढळले तरी एकही मृत्यू झालेला नाही हे विशेष. तालुक्याने बऱ्यापैकी मृत्यूवर नियंत्रण मिळवल्याचेच यातून दिसत आहे. चंदगड, गगनबावड्यात देखील एकही मृत्यू झालेला नाही हे आणखी एक विशेष. तेथे संसर्गाचे प्रमाणही खूपच अत्यल्प आहे. चंदगडमध्ये १० तर गगनबावड्यात केवळ दोनच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
चौकट
कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यू
रविवारी ३६ जणांना मृत्यू झाला. त्यातील तब्बल १० मृत्यू हे कोल्हापूर शहरातील आहेत. यात ४ सीपीआरमधील तर ६ मृत्यू हे खासगी रुग्णालयातील आहेत. संसर्गाचे प्रमाण ३२२ आले असल्याने शहरवासियांना हा दिलासा असला तरी वाढणारे मृत्यू हे धडकी भरवणारे ठरत आहेत.