कोल्हापूर : पाच दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पुन्हा दोन कोरोनाचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद तीनच दिवस टिकला. आता गेल्या दोन दिवसांत सलग प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे.
२० एप्रिल रोजी त्याआधीच्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीनही दिवशी एकही रुग्ण नोंदविला गेला नाही. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त झाला आहे. एकीकडे दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या वाढत निघाल्याने, तेथे मास्क सक्ती केली गेल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांनी संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २५४१ नवे रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १६,५२२ झाली आहे. ३० जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मास्क वापरणे टाळू नये असेही ते म्हणाले.