कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चंदगड तालुक्यातील तिलारीनगर, पारगड झांबरे, फाटकवाडी, किटवाड धरण, सुंडी धबधवा, महिपाळगड, वैजनाथ देवस्थान, हाजगोळी (चाळोबा देवस्थान तलारी मुख्य धरण) या ठिकाणी शासनाच्या विविध खात्यांमार्फत विनामास्क, समूहाने फिरणाऱ्या नागरिकांची धडक तपासणी करण्यात आली. या तपासणी कॅम्पमध्ये ९४१ अॅन्टिजन, ६६आरटीपीसीआर अशा एकूण १००७ तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये १००४ निगेटिह व तिघेजण बाधित आढळून आले. बाधित रुग्णांची कोविड काळजी केंद्रात रवानगी करण्यात आली.
सार्वजनिक सुट्टीदिवशी अचानक चंदगड तालुक्यातील पर्यटनस्थळाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, महसूल अधिकारी, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, कृषी विभाग, पोलिस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षाविहार करणारे पर्यटक, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची आरएटी, आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.
पुढील काही दिवसांत वर्षाविहार करणारे पर्यटक, विनामास्क फिरणाऱ्या, तसेच विनापरवाना समूहाने फिरणाऱ्या नागरिकांची आरएटी, आरटीपीसीआर तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून कारवाईस सामोरे जाऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे.
प्रांताधिकारी पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विनोद रणावरे, नायब तहसीलदार एस. जी. राजगोळे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, डी. जी. राक्षे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. जाधव, अभियंता एस. व्ही. सावळगी, डॉ. ए. जे. पठाणे, डॉ. एस. जी. कांबळे, मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक यांनी या तपासणी कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता.
फोटो ओळी : चंदगड तालुक्यात वर्षाविहारसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची आरोग्य व प्रशासन विभागाने कोरोना तपासणी केली.
क्रमांक : २१०६२०२१-गड-०१