रुकडी : रुकडी (ता. हातकणंगले) येथील पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात २ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे, तर एकूण ४६ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. रुकडी ग्रामपंचायतीने चार दिवस गावबंद केले असून नागरिक चौकाचौकात व मुख्य मार्गावर फिरत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनही हतबल झाले आहे.
रुकडी येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश हातकणंगले तहसीलदारांनी यांनी दिले आहेत. येथे विलगीकरण कक्षाची आवश्यकता असून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे विलगीकरण करणे आवश्यक बनले आहे. दरम्यान, तहसीलदार प्रदीप उबाळे व आरोग्य अधिकारी कोरे यांनी रुकडी गावास भेट दिले असून रुग्णांची संख्या वाढू नये, नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी सरपंच रफिक कलावंत यांनी केली आहे.
नागरिकांना ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद द्यावा अन्यथा परिस्थिती बिकट बनेल, असे आवाहन सरपंच रफिक कलावंत व पोलीस पाटील कविता कांबळे यांनी केले आहे.