कोल्हापूर : भारत माता की जय ! अशा घोषणा देत उत्तरप्रदेशमधील 1 हजार 440 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वा. प्रयागराजकडे रवाना झाले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सकाळी 11.30 वा. जेवण, नाश्ता आणि पाणी याचे किटचे वाटप या मजुरांना केले. त्याचबरोबर त्यांच्याशी संवादही साधला.
प्रशासनाने, सेवाभावी संस्थेने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून हा आनंद व्यक्त केला.उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध तालुक्यांमधील मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या मजुरांशी संवाद साधत त्यांची आस्तेवाईपणे विचारपूस केली.
आज आणि उद्यासाठी त्यांना लागणाऱ्या जेवणाचे किट त्यांनी या मजुरांना दिले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, स्थायी समिती सभापती संदिप कवाळे, पश्चिम देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, उपस्थित होते.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते विजय देवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रयागराजकडे ही रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीरच्या तहसिलदार शीतल मुळे- भामरे, पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, अशोक जाधव आदी यावेळी उपस्थित होते.24 बोगीमधून 1 हजार 440 प्रवासीकरवीरमधील 667, गगनबावडामधील 16 आणि कोल्हापूर शहरामधील 757 कामगार रेल्वेच्या 24 बोगीमधून प्रयागराजकडे आज रवाना झाले.राज्य शासनाच्या निर्णयाने कामगारांना दिलासा-पालकमंत्री सतेज पाटीलराज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार,पर्यटक,प्रवासी, विद्यार्थी अशा सर्वांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यांमध्ये परत पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामधील सुमारे 4 हजार कामगार त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत. या सर्वांच्या रेल्वेच्या तिकीटांचा खर्च हा राज्य शासनाने उचलला आहे. त्यामुळे या कामगारांना दोन दिवस पुरेल अशा जेवण,नाश्ता,पाणी बॉटल तसेच मास्क या सर्वांची सुविधा आमच्यावतीने करण्यात आली आहे. याच पध्दतीने जिल्ह्यामध्ये अद्यापही अडकलेल्या कामगारांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये परत पाठवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर