कोल्हापूर : कोरोनोविरोधातील लढ्यासाठी गोकुळ दूध संघानेही खारीचा वाटा उचलला आहे. ५१ लाखांच्या मदतनिधीचा धनादेश गुरुवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते व चेअरमन रवींद्र आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. ५१ लाखांच्या या मदतीत गोकुळ दूध संघाचे २९ लाख, तर कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगाराच्या २२ लाख रुपयांचा समावेश आहे.कोल्हापूरसह राज्यात कोठेही संकट आले तरी मदतीसाठी गोकुळ दूध संघ कायमच आघाडीवर असतो. आताही कोरोनाने थैमान घातल्याने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी गोकुळ दूध संघ पुन्हा एकदा धावून आला. या आर्थिक मदतीबरोबरच उत्पादक आणि ग्राहक यांचे हित जपण्याचाही प्रयत्न संघाने केला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता दूध संकलन चालू ठेवले असून, दूध अत्यावश्यक असल्याने मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील ग्राहकांपर्यंत योग्य ती खबरदारी घेऊन पोहोचविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यामधील सर्व गावांमध्ये संघामार्फत पशुखाद्य व पशुवैद्यकीय सेवाही तातडीने पुरविण्यात येत आहेत.यावेळी साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख, गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, कर्मचारी संघटना जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सेक्रेटरी सदाशिव निकम, संघटना प्रतिनिधी शंकर पाटील, मल्हार पाटील, लक्ष्मण पाटील, संग्राम मगदूम, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे उपस्थित होते.