कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या घडीला रुग्णसंख्येत शाहूवाडी तालुका सगळ्यात पुढे आहे. या तालुक्यातील १० रुग्ण आतापर्यंत सापडले असून हे सर्व मुंबईहून आलेले आहेत.शाहूवाडीसह चंदगड, आजरा, भुदरगड या तालुक्यांचा मुंबईशी फार संपर्क आहे. या तालुक्यांतील अनेक गावांची अर्थव्यवस्थाच मुंबईशी जोडलेली आहे. त्यामुळे याच तालुक्यात मुंबईहून येणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे.
या चार तालुक्यात आता सुमारे २७ रुग्णसंख्या आहे. म्हणजे एकूण रुग्णातील ४८ टक्के रुग्ण या तालुक्यातील आहेत.गूड न्यूज : समूह संसर्ग नाहीकोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी दोन गोष्टी अजूनही चांगल्या आहेत. एक म्हणजे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या मर्यादित आहे. आतापर्यंत कोल्हापुरात फक्त एकच इचलकरंजी येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांनाही अन्य आजारांची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाला लवकर बळी पडले.
दुसरे म्हणजे ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सर्व बाहेरून आलेले आहेत. प्रवासामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही चांगली बाब म्हणजे स्थानिक पातळीवर कुठेही समूह संसर्गातून लागण झालेली नाही. आताही ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांची वेळेत तपासणी झाली आहे.करवीर व गगनबावडा सुरक्षितजिल्ह्यातील करवीर व गगनबावडा हे दोन तालुके सुरक्षित आहेत. या तालुक्यात अजून एकही रुग्ण सापडलेला नाही. या तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे व गावांनी कडक लॉकडाऊन केल्याचाही परिणाम असू शकतो. कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरही तसे करवीर तालुक्यातच येते परंतु त्यांचे स्वतंत्र अस्तित्व विचारात घेतल्यास करवीर तालुक्यात रुग्ण आढळून आलेला नाही.
लॉकडाऊनच्या काळात कोल्हापुरात लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे लॉकडाऊन यशस्वी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोल्हापूर समूह संसर्ग रोखण्यात आतापर्यंत यशस्वी झाला आहे हे त्याचेच महत्त्वाचे कारण आहे.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी कोल्हापूर
कोरोना सांख्यिकी माहिती, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती
- एकूण रुग्ण : ५८
- बरे झालेले रुग्ण : १३
- उपचार घेणारे : ४४
- मृत्यू : ०१
- एकूण तपासणी केंद्रे : २०
- सोमवारपर्यंत घेतलेले स्राव : १११९५
- तपासणी अहवाल प्रलंबित : ५८७७सोमवार दुपारी २ वाजेपर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या : ५८
- शाहूवाडी : १०
- भुदरगड : ०७
- राधानगरी : ०७
- कोल्हापूर शहर (कसबा बावडासह) : ०६
- आजरा : ०६
- चंदगड : ०४
- पन्हाळा : ०४
- शिरोळ :०४
- इचलकरंजी : ०३
- हातकणंगले : ०१
- गडहिंग्लज : ०१
- कागल : ०१
- कर्नाटक व तमिळनाडूला निघालेले : ०४