कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी एकाच दिवसात चार रुग्ण आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विक्रमनगर येथील दाट वस्तीत एक अठरा वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. या तरुणीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देऊनही ती घरीच थांबली होती, त्यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रेडझोन मधून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींची सक्तीने तपासणी केली जाते तसेच त्यांना आवश्यकतेनुसार संस्थात्मक किंवा गृह अलगीकरण करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा वाढलेल्या रुग्णापासून इतरांना धोका कमी आहे. परंतु विक्रमनगरातील तरुणी संस्थात्मक अलगीकरणाचा सल्ला धुडकावून ती घरी गेली आणि तेथेच वास्तव्य केले. त्यामुळे तिच्यापासूनचा धोका वाढलेला आहे.
ही तरुणी सातारा येथे नातेवाईकांकडे गेली होती. लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर तिचे वडील तिला मागच्या गुरुवारी (दि. १४ मे) घेऊन कोल्हापूरला आले होते. त्यावेळी या तरुणीची सीपीआर रुग्णालयात तपासणी करुन स्वॅब घेण्यात आला.
संशय आल्यामुळे तिला संस्थात्मक अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. परंतू ती प्रशासनाची दिशाभूल करुन विक्रमनगरातील घरी गेली. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा ती घरीच असल्याची बाब समोर आली.