कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा वेळी लोक घराबाहेर पडून छुप्या मार्गाने ब्यूटी पार्लरसह जवळच्या पर्यटनस्थळी फिरायला जात असल्याचे काहीजणांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या फोटोंची माहिती घेऊन पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो टाकण्याची हौस अंगलट येऊ लागली आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे रस्त्यावर येणार प्रत्येक नागरिकाची चौकशी करून पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. काही महिला फोनवरून ब्यूटी पार्लरची वेळ घेऊन घरी जात आहेत.
काहींनी तेथील फोटो फेसबुकवर टाकून आपली हेअर स्टाईल दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काहींनी शहरालगतच्या पर्यटनस्थळी जाऊन तेथील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत. फेसबुक, इन्स्ट्राग्रामवर पोलिसांचा सायबर विभाग लक्ष ठेवून आहे.
लॉकडाऊन काळात बाहेर पडून फोटोसेशन करणाऱ्यांची माहिती घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची चाहूल लागल्याने अनेकांनी सोशल मीडियावर फोटो टाकण्याचे टाळले आहे.