कोल्हापूर : ‘कोरोना’ची वाढती व्याप्ती पाहता जिल्ह्यातील सीमा हद्दीवर नाकाबंदी आणखी कडक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासह वाहनात बसलेल्या सर्वांच्या माहितीचे संकलन करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्याशिवाय वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख २२ मार्गांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता; तो आणखी कडक केला आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय जिल्ह्यात कोणी प्रवेश करणार नाही, याची दक्षता पोलीस दलाकडून घेतली जात आहे.
इतर जिल्ह्यांतून अगर परप्रांतांतून वाहनांतून अगर पायी येणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर आहे. अशा व्यक्तींना उचलून थेट पोलिसांच्या ‘होम सेंटर'मध्ये दाखल केले जाते. तेथे वैद्यकीय तपासणी होते.
दरम्यान, दि. २८ मार्चला काही रुग्णवाहिकेतून बोगस रुग्ण दाखवून जिल्ह्यात प्रवेश करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पकडले होते. त्याच दिवशी एका रुग्णवाहिकेतून वृद्धा कोल्हापुरात आली. त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे आता पोलिसांनी नाकाबंदी अधिक तीव्र केली आहे.
जिल्ह्यात प्रवेशणाऱ्या अत्यावश्यक वाहनांसह प्रत्येक वाहनचालकाची व वाहनात असणाऱ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोठून आला, कोठे जाणार, आदी सर्व माहितीसह त्यांचे फोटो काढून संकलित केले जात आहेत.मुंबईकरांचा सोलापूरमार्गे कोल्हापूर प्रवासमुंबई परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले. तेथे अडकलेले काहीजण थेट कोल्हापुरात न येता मुंबईतून मिळेल त्या वाहनाने सोलापूरसारख्या जिल्ह्यात जातात व तेथून कोल्हापूर शहरात येण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याचे चित्र आहे.