कोल्हापूर : नागरिक घराबाहेर पडण्याचे थांबत नसल्यामुळे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रबोधनासाठी स्वत: रस्त्यावर उतरले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, विनाकारण घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, सर्दी, ताप, खोकला अंगदुखी असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या, घरी राहा सुरक्षित राहा, असे आवाहन आयुक्तडॉ. कलशेट्टी यांनी जोशीनगर झोपडपट्टी येथील नागरिकांना केले.महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणू (कोविड - १९)चा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या वतीने गणेश कॉलनी, राजगुरूनगर, सुभाषनगर, टाकाळा झोपडपट्टी राजेंद्रनगर, बुद्ध गार्डन प्रभाग या परिसरात औषध फवारणी व स्वच्छता करण्यात आली. तसेच जोशीनगर झोपडपट्टी येथे कोरोना विषाणूबाबत प्रबोधन केले. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, आदी उपस्थित होते.