रूकडी : एकीकडे आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोनाशी लढाई करणेकरिता सज्ज व्हा व घराबाहेर पडू नका असे वारंवार विनंती करूनही रूकडी येथे नागरिक फार गांभीर्याने न घेता थेट आठवडा बाजार भरवून कोरोना बाबत किती आपण गंभीर आहे, याची चुणूकच दाखवून दिली.रूकडी येथे दर गुरूवारी आठवडा बाजार भरतो.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे 31 मार्च अखेर बाजार भरणार नसल्याचे जाहीरही केले होते, त्याचबरोबर गेली दोन दिवस रूकडी अतिग्रे, इचलकरंजी रोड, गांधीनगर कोल्हापूर मार्ग व रूकडी माणगाव रस्ता बंद करून गावच्या वेशी बंद केले होते.
या शिवाय या सर्व मार्गावर व्हाईट आर्मी व सेवाभावी सदस्य ठेवून बाहेरील आत व आतील बाहेर कोणास सोडत नव्हते गेली दोन दिवस गावातील दुचाकीवरून कोणास फिरूही देत नव्हते. त्याचबरोबर प्रत्येक वेशीवर ग्रामपंचायत कर्मचारी ही तैनात करून वातावरण कडक केले होते.
पण काल दि 26 रोजी गुरुवार बाजार भरवून रूकडी ग्रामपंचायतीने कोरोनाबाबत किती सजग आहे याचा नमुना दाखविला. विशेष म्हणजे रूकडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगराई वाढू नये याकरिता ग्रामपंचायतीने गावात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कीटकनाशक फवारणी करून नागरिकांची काळजी ही घेतली होती पण आठवडा बाजारच भरवून रूकडी ग्रामपंचायत कोरोनाबाबत किती दक्ष आहे याचा नमुना दाखविला आहे.