कोल्हापूर : जिल्ह्यातील पेठवडगावच्या ३० हून अधिक नागरिकांची इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या अहवालाकडे आता जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू तपासणी संस्थेवर या चाचण्यांचा मोठा ताण आल्याने अहवालासाठी विलंब लागत आहे.येथील सीपीआर रुग्णालयासह आयजीएम, इचलकरंजी येथे बुधवारी (दि. २५) दिवसभर परदेशातून आलेल्या दोघांची आणि प्रामुख्याने इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या पेठवडगाव येथील नागरिकांची तपासणी करण्यात आली. या १६ जणांचे स्राव घेऊन रुग्णवाहिका पुण्याकडे रवाना झाली. तोपर्यंत रात्री ११च्या सुमारास पेठवडगाव येथील ११ जणांना ‘सीपीआर’मध्ये तपासणीसाठी आणण्यात आले.एवढ्या मोठ्या संख्येने पेठवडगावहून नागरिकांना आणले गेल्याने आणि ते इस्लामपूरच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये या रात्री ११च्या सुमारास ‘सीपीआर’ला आल्या.
किणी टोलनाक्यापुढे गेलेली रुग्णवाहिका पुन्हा मागे बोलावण्यात आली. त्यानंतर आणखी १९ स्राव घेऊन ही रुग्णवाहिका पुण्याकडे रवाना झाली. रात्री साडेबारानंतर डॉ. गजभिये यांनी सीपीआर सोडले. या दरम्यान ‘सीपीआर’च्या पथकाने युद्धपातळीवर या सर्वांचे स्राव घेण्याचे काम केले.आता या ३५ जणांच्या अहवालाकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. यातील बहुतांश नागरिक हे इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने याचे एक दडपण प्रशासनावर आल्याचे दिसून आले.अहवाल येण्यास विलंबपुण्यातील राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेकडे पाचही जिल्ह्यांतून घशातील स्राव तपासणीसाठी जात असल्याने आता तेथे कामाचा मोठा ताण आला आहे. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरच्या पुढे २२०० स्राव तपासण्याचे काम शिल्लक होते. एका तासाला ९६ अहवाल मिळत असल्याने कोल्हापूरच्याही अहवालांना विलंब होणार असल्याचे सांगण्यात आले.नऊ महिन्यांच्या बालकाची तपासणीदरम्यान, गुरुवारी ‘सीपीआर’मध्ये परदेशातून आलेल्या पाचजणांची आणि भारतांतर्गत प्रवास केलेल्या ३२६ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एका नऊ महिन्यांच्या बालकाचीही तपासणी करण्यात आली आहे.
या बाळाची मावशी पुण्याहून कोल्हापूरला आली आहे. त्यानंतर बाळाला ताप येत असल्याने त्याची तपासणी करून अन्य रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दिवसभरात ‘सीपीआर’मधून चारजणांच्या घशातील स्राव घेण्यात आले आहेत.मिरज लॅबसाठी युद्धपातळीवर प्रयत्न : राजेंद्र पाटील-यड्रावकरमिरज येथे विषाणू परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मिरज येथील प्रयोगशाळेसाठी आवश्यक बांधकाम पूर्ण झाले आहे.
उपकरणांची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी निधीची अडचण नाही. ही यंत्रणा कार्यरत करण्यासाठी जे मनुष्यबळ हवे, त्यांचे पुण्याला प्रशिक्षण करून आणले आहे. आता फक्त केंद्र सरकारकडून परवानगीची आम्हांला प्रतीक्षा आहे. ती आल्यानंतर तातडीने हे काम पूर्ण केले जाईल.