कोल्हापूर : बावड्यातील कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील पाचसदस्यांसह १७ जणांचा अहवाल आज निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिरज येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज दिला. कोरोनावर उपचार घेणाऱ्या त्या ६३ वर्षीय महिलेचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता.कसबा बावडा येथे राहणारी ही महिला २० व २१ मार्च रोजी सातारा येथे गेली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ ते २८ मार्च ती कोरेगाव तालुक्यातील बनवडे येथे गेली होती. २८ मार्च रोजी ती कोल्हापूरमध्ये परत आली होती.
तीला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे ३० मार्चला दिसून आली. दुसऱ्याच दिवशी ३१ मार्चला खासगी रुग्णालयात तिने उपचार घेतला. ३ एप्रिल रोजी बावड्यातील सेवा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीपीआरमध्ये दाखल करुन तिचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला.यादरम्यान तिच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्याबाबत पुढील खबरदारीचे उपाय म्हणून कार्यवाही सुरु केली होती.