कोल्हापूर : कोरोना संसर्गाविरोधात सर्वांचीच लढाई सुरू आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात कर्तव्यावर असलेल्या शहरातील पोलिसांना मोफत होमिओपॅथिक औषधे वाटप करून एका डॉक्टरने सामाजिक बांधिलकी जपली आहे.विक्रमनगर येथे खासगी दवाखाना असलेले डॉ. गिरिष कोरे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात. जनरल प्रॅक्टिशियन असोसिएशनसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपला खासगी दवाखाना सकाळी व सायंकाळी सुरू ठेवला आहे.
रिकाम्या वेळेत ते शहरात फिरून आपल्याकडील होमिओपॅथिक औषधे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना वाटप करीत आहेत. आतापर्यंत दाभोळकर कॉर्नर, टेंबलाई नाका, लक्ष्मीपुरी येथील पोलिसांना त्यांनी ही औषधे दिली आहेत. लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी आपले आयुष्य धोक्यात घालून पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे. त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी ही औषधे देत असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही औषधे दिली आहेत.