कोल्हापूर : ‘कोरोना’ विरोधातील लढाईत आता माजी सैनिकही पुढे आले आहेत. त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.‘मराठा लाईट इन्फट्री’ या रेजिमेंटशी संलग्न असलेल्या ‘१०९ इन्फट्री बटालियन (टीए) मराठा’मधील निवृत्त सैनिकांची आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय कल्याण संस्था कार्यरत आहे. या संघटनेमध्ये कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कर्नाटक, रत्नागिरी, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातील सुमारे ७२३ माजी सैनिक आहेत.या संघटनेतर्फे कोरोना विरोधातील लढाईसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एम. वाय. सावर्डेकर, लिपिक प्रसाद राणे, संघटनेचे पदाधिकारी निवृत्त सुभेदार अशोक पोवार, निवृत्त मेजर संजय शिंदे, निवृत्त हवालदार आनंदा पाटील, कृष्णात गुरव, आदी उपस्थित होते.