संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) करण्यात येणारे मूल्यांकन लांबणीवर पडणार आहे. एप्रिलअखेर मूल्यांकनासाठी कोअर टीमच्या विद्यापीठ भेटीवरदेखील अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.विविध अधिविभाग आणि प्रशासकीय विभाग, विद्यार्थी, महाविद्यालय, अभ्यासक्रम, संशोधनविषयक माहिती विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने संकलित करून त्याचा इन्स्टिट्युशन इन्फॉर्मेशन फॉर क्वालिटी अॅश्युरन्स (आयआयक्यूए) अहवाल तयार करून तो दि. ३ डिसेंबर रोजी ‘नॅक’च्या पोर्टलवर जमा केला. तो समितीकडून मान्य झाला. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारीला ‘सेल्फ स्टडी रिपोर्ट’ (एसएसआर) सादर करण्यात आला.
त्याची पडताळणी करून स्टार्टअपचे प्रमाण, प्रदान केलेली शिष्यवृत्ती, आदींबाबतच्या पुराव्यांची मागणी आणि काही त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना ‘नॅक’ने केली. त्याची पूर्तता विद्यापीठाकडून करण्यात आली. त्यानंतर ‘नॅक’कडून ‘डीव्हीव्ही’ची (डेटा व्हॅलिडिटेशन अँड व्हेरिफिकेशन) अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन, संशोधन आणि समाजाभिमुख भूमिका, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना पाठबळ, प्रशासन, उपक्रम व योजना, वेगळेपण या विविध निकषांनुसार विद्यापीठाची विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक माहिती पूर्तता होऊन एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात कोअर टीमने विद्यापीठाला भेट देऊन, पाहणी करून मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सध्या डीव्हीव्हीची प्रक्रिया पूर्णत: थांबली आहे. लॉकडाऊनबाबत पुढे काय होईल याची काही कल्पना नाही. डीव्हीव्हीची प्रक्रिया आणि त्यातील अयोग्य वाटणाऱ्या मुद्द्यांना विद्यापीठाने आव्हान देण्याची मूल्यांकन प्रक्रियेत तरतूद आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान एक महिना लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.विद्यार्थी समाधान सर्व्हेक्षणामध्ये अडचणएप्रिलमध्ये मूल्यांकन होणार असल्याचे गृहीत धरून यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्ययन व अध्यापन, संशोधन आणि समाजाभिमुख भूमिका, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना पाठबळ, प्रशासन, उपक्रम व योजना, वेगळेपण या विविध निकषांनुसार विद्यापीठाची विश्लेषणात्मक आणि संख्यात्मक माहिती विद्यापीठाने सादर केली आहे. मूल्यांकनात विद्यार्थी समाधान सर्वेक्षण हे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांतून केले जाते. या विद्यार्थ्यांची मेमध्ये परीक्षा झाल्यास त्यांना ‘नॅक’च्या कोअर टीमला भेटता येणार नाही. त्यांचे सर्व्हेक्षण करता येणार नाही. त्यासाठी अंतिम वर्षातील नवीन विद्यार्थी येणे, त्यांना मूल्यांकन प्रक्रियेची माहिती देण्यात अधिक वेळ जाणार आहे.
नॅक मूल्यांकनाबाबतची विद्यापीठाच्या पातळीवरील सर्व प्रक्रिया, अहवाल सादर केले आहेत. विविध अधिविभागप्रमुखांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या कालावधीत वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आपापल्या विभागांची सादरीकरणे तयार केली आहेत.- डॉ. आर. के. कामत,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष