सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : गाड्या बंद असल्यामुळे चालत गावी परतणाऱ्या कुटूंबाला स्वत:कडील जेवण देत दुधाच्या गाडीतून गावाकडे पाठवणाऱ्या पोलिसांचे कौतुक होत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर काठीचे रट्टे हाणणाऱ्या पोलिसांतील माणुसकीचेही दर्शन गुरुवारी वाघबीळ घाटात घडले.कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून सर्वत्र संचारबंदी केल्याने पै-पाहुण्यांकडे गेलेल्या लोकांना गावाकडे जाणे मुश्किल झाले होते. दोनच दिवसापूर्वी मलकापूर येथील एक कुटूंब केर्ली (ता. करवीर) येथे घरगुती कार्यक्रमासाठी आले होते.
गावात पै-पाहुण्यांना आसरा देऊ नका असा फतवा प्रत्येक ग्रामपंचायतीने काढल्यामुळे या कुटूंबानेही गड्या! आपला गाव बरा असे म्हणून गुरूवारी बोजा गुंडाळून गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण गाड्या बंद असल्यामुळे अखेर त्यांनी पायी चालत जाण्याचे ठरविले. मलकापूर जवळील धनगर वाड्यातील नवरा, बायको आणि दोन मुलींचे हे कुटूंब सकाळी सात वाजता केर्ली येथून निघाले.घाट चढून दुपारी एकच्या सुमारास घामाघूम होत ते वाघबीळ फाटा येथे पोहचले.पण समोर पोलिस पाहून त्यांची पाचावर धारण बसली. पोलिसांच्या माराच्या भितीने घाबरलेल्या या कुटूंबाने पायी चालत गावी जात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांमधील माणुसकी जागली.
त्यांनी वाघबीळातील बसस्थानकात त्यांना बसवून स्वत:कडील जेवण आणि पाणी देऊन त्यांना धीर दिला आणि त्यांना दुध भरायला जाणाऱ्या गाडीतून त्यांना त्यांच्या गावाकडे सुखरूप पाठवले. ४० किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठणे त्या कुटूंबासाठी मुश्किल होतं; परंतू पोलिसांमुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला.शाहुवाडी निर्भया पथकातील पोलिस राहूल मस्के, समीराज पाटील, पोपट माने, सुशिल सांवत या पोलिसांच्या माणूसकीमुळे हे शक्य झाल्याने त्या कुटंूबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.