कोल्हापूर : एरव्ही मेपर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यात न येणारा हापूस आंबा यावर्षी मात्र हंगामाच्या सुरुवातीसच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे मागणीच नसल्याने दरात मोठी घसरण झाली असली, तरी चव आणि रंगाची प्रतही खालावली आहे.बाजारसमिती कोकणचा हापूस व मद्रास हापूसही आवक सुरू झाली आहे. गुरुवारी सौद्याला ५0 पेट्या तर ३२00 बॉक्स आले होते. सौद्याला पेटीचा दर सरासरी १७५0 रुपये इतका निघाला आहे. एका पेटीत पाच ते आठ डझन आंबे असतात. दोन ते अडीच डझनाच्या बॉक्सचा दर सरासरी ३२५ इतका निघाला आहे. आंबे हंगामाच्या सुरुवातीस एवढा निच्चांकी दर पहिल्यांदाच निघाला असल्याचे आंबा व्यापाऱ्यांनी सांगितले.घाऊक बाजारात ही परिस्थिती असताना किरकोळ बाजारात तर आंब्याला गिऱ्हाईकच नाही, अशी परिस्थिती आहे. लक्ष्मीपुरी, राजारामपुरीत कोपऱ्या कोपऱ्यांवर आंबा विक्रीचे स्टॉल दिसू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी एक हजार रुपये असा दर होता. तो गुरुवारी ३00 ते ५00 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दर कमी आहे म्हणून खरेदी केला तरी त्याला म्हणावी तशी चव, रंगही नसल्याचे चोखंदळ खवय्ये सांगत आहेत. किडलेला आणि कुजका माल घालण्याचे प्रमाणही जास्त दिसत असल्याचेही निरीक्षण काहींनी नोंदविले.मोहाला आवरदर उतरले तरी ग्राहकांनी पाठच फिरवली आहे. कोरोनामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे; त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांमध्ये निरुत्साह कायम आहे. १६ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आधीच घरचे आर्थिक गणित कोलमडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पैसा शिल्लक ठेवावा लागणार असल्याने आंब्यासारखी चैन आताच्या काळात परवडणारी नाही; त्यामुळे आंबा चाखण्याचा कितीही मोह झाला तरी सध्या त्याला आवर घालण्याचीच मानसिकता दिसत आहे.