कोल्हापूर : मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरातील एकाच कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण होताच महापालिका यंत्रणेने संपूर्ण लक्ष या वसाहतीवर केले आहे.
भक्तिपूजानगरसह सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांना ‘होम क्वारंटाईन’ केले असून, महापालिका आरोग्य विभागाच्या आठ पथकांतील ऐंशी कर्मचारी घरोघरी जाऊन तेथील रहिवाशांची आरोग्य तपासणी करीत आहेत. याशिवाय गेल्या तीन दिवसांपासून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.कोल्हापूर शहरातील पहिला कोरोना रुग्ण भक्तिपूजानगर येथे आढळून आल्यानंतर महापालिका आरोग्य विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला. ज्या दिवशी रात्री या संशयित रुग्णाचा स्राव अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत पोलीस यंत्रणेने संपूर्ण परिसर बॅरिकेट लावून होम क्वारंटाईन केला. तर पालिका आरोग्य विभागाने पहाटेपासून लागलीच औषध फवारणी सुरू केली. क्वारंटाईन केलेले रहिवाशी तेथून बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता पोलिसांनी घेतली आहे.