कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोघे भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले. पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत २२ वर्षीय तरुणीच्या पुढील दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत तर कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्धेच्या घशातील स्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यांचीही कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे समाधानकारक चित्र आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले कोरोनाबाधित झालेल्या मंगळवार पेठेतील भक्तिपूजा नगरातील भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना ेशनिवारी अथायू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला तर पेठवडगाव येथील मिरज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित तरुणीच्याही पुढील दोन्हीही चाचण्या यापूर्वी निगेटिव्ह आल्या आहेत.
त्यामुळे त्यांना मिरज येथेच प्रशासकीय इमारतीत स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने येत्या दोन दिवसांत त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.याशिवाय कसबा बावडा येथील बाधित वृद्धेचीही प्रकृती उत्तम आहे. त्यांचे १४ दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. त्यांच्या घशातील पहिला स्राव तपासणीसाठी घेण्यात येणार आहे. तो निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा पुढील दोन-तीन दिवसांत आणखी एक स्राव घेऊन तो निगेटिव्ह आल्यास त्यांनाही कोरोनामुक्त घोषित करून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.
सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती उत्तम आहे. शाहूवाडीतील दिल्लीतील मरकजहून आलेला तरुण, त्याची आई आणि चुलतभाऊ या तिघाही कोरोनाबाधितांवर ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.मुंबईहून कर्नाटकात निघालेल्या मजुरांना अडवून कोल्हापुरात सीपीआरमध्ये त्यांची तपासणी केली. त्यातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने ‘सीपीआर’च्या आरोग्य प्रशासनावर पुन्हा ताण आला आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना परजिल्ह्यांतून आलेला व पर राज्यांत जाणारा हा प्रवासी कोरोनाबाधित झाल्याने यंत्रणा खडबडली आहे.