कोल्हापूर : पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत १४ एप्रिलनंतर निर्णय होणार आहे; त्यामुळे सध्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीमध्ये आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील काही अधिविभागांतील प्राध्यापकांकडून सुुरू आहे. कुलगुरूंसह कुलसचिव, प्र-कुलगुरू, वित्त व लेखाधिकारी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक या अधिकाऱ्यांची निवासस्थाने त्यांची कार्यालये बनली आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून विद्यापीठातील अधिविभाग आणि संलग्न महाविद्यालयांतील वर्ग भरणे बंद आहेत. वसतिगृहातील विद्यार्थी हे आपापल्या घरी गेले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि कामाच्या गरजेनुसार कर्मचारी विद्यापीठात उपस्थित राहत आहेत. लॉकडाऊन असले तरी विद्यापीठातील अध्ययन आणि अध्यापन, प्रशासकीय विभागांचे कामकाज सुरू आहे.
सामाजिक कार्य विभाग, पत्रकारिता व मास कम्युनिकेशन, आदी अधिविभागांमधील प्राध्यापक हे आॅनलाईन पद्धतीने, सोशल मीडियाचा वापर करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करीत आहेत, शिक्षण देत आहेत. त्यासाठी काही विभागांच्या प्राध्यापकांनी स्वतंत्र असे व्हॉट्स अॅप ग्रुपदेखील तयार केले आहेत.
नॅक मूल्यांकनाची तयारी, आर्थिक वर्षअखेर, लॉकडाऊन संपल्यानंतर परीक्षा घेण्याबाबत निर्णय झाल्यास त्याचे सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे काम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि राज्य शासनाचे आदेश, सूचनांनुसार कार्यवाही करणे, आदी पातळ्यांवरील प्रशासकीय कामकाज हे अधिकारी ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून करीत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असले तरी विद्यापीठाचे कामकाज मात्र, अशा पद्धतीने सुरू असल्याचे चित्र आहे.