कोल्हापूर : शेतात पिकविलेला भाजीपाला गिऱ्हाईक नाही म्हणून फेकून देण्याची वेळ आली असताना किरकोळ बाजारात मात्र भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेतमालाची टंचाई असल्याचे सांगून किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात खरेदी केलेल्या दरापेक्षा चौपट दर लावून विक्री सुरू केली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या या मनमानीमुळे आधीच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सौद्याला भाजीपाल्याची आवक मुबलक असल्याने घाऊक दरातही कमालीची घसरण झाली आहे. २५ रुपयांना १० किलो कोबी, १५० रुपयांना १० किलो वांगी, ६० रुपयांना १० किलो टोमॅटो असा सौद्याचा दर निघाला आहे; पण याच वेळी हेच दर किरकोळ बाजारात मात्र ६० रुपये किलो वांगी, १५ रुपये किलो टोमॅटो असे आहेत.
कोथिंबीर साडेसहा रुपये पेंढी असताना किरकोळ बाजारात एका पेंढीचा दर ३० रुपये आकारला जात आहे. गाजरही ७५ रुपयांना १० किलो असताना ४० ते ५० रुपये किलो दर लावण्यात आला आहे. मेथी साडेआठ रुपये एक पेंढी असताना बाजारात २० ते २५ रुपये आहे. यावरून किरकोळ विक्रेत्यांनी चौपटीने दर वाढवून ग्राहकांना लुबाडण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते.लॉकडाऊनमुळे मार्केट यार्डात सौद्यापर्यंत माल पोहोचविता येत नसल्याने एकीकडे शेतकरी ट्रॉलीने भाजीपाला शेतातच फेकून देत आहे. वाहनाची तजबीज करून सौद्यापर्यंत गाडी आणली तर पडलेल्या दरामुळे गाडीभाडेही निघत नाही. त्यामुळे एक तर भाजीपाला शेतातच कुजू दिला जात आहे, फुकट वाटला जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. गावागावांत ही विदारक परिस्थिती असताना, शहरात मात्र विक्रेत्यांकडून ग्राहकांना लुबाडले जात आहे.हे वागणं बरे नव्हेदिवसभर एका ठिकाणी बसून विक्री करण्याला वेळ व श्रम लागतात हे मान्य. त्याबदल्यात दुप्पट फायदा व्हावा ही विक्रेत्यांची अपेक्षाही रास्तच; पण दुप्पट, तिप्पट राहू दे ;चौपट दर आकारणी करणे हे नैतिकतेला धरून नाही. लॉकडाऊन असतानाही विक्रेत्यांची उपासमार नको म्हणून प्रशासनाने भाजी विक्रीचे नियोजन केले आहे; पण ज्यांच्यावर दया दाखवली तेच विक्रेते आज सर्वसामान्यांच्याच उरावर बसू लागले आहेत.
आधीच लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार गेल्याने जनता आर्थिक कोंडी अनुभवत आहे. त्यात त्यांचेच समाजबांधव असलेले हे विक्रेते मात्र त्यांच्याच खिशात हात घालून त्यांच्या संयमाचा अंत पाहत आहेत. अडचणीत असताना लुबाडणे ही संस्कृती नाही, त्यामुळे हातात दंडुका घेऊन ‘हे वागणे बरे नव्हे,’ असे सांगण्याची वेळ आली आहे.