कोल्हापूर : ‘कोरोना विषाणू’चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आदेश लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री नऊ वाजता नागरिकांनी नऊ मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे लावावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाचे उल्लंघन करून कोणी घराबाहेर पडल्यास किंवा रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच हुल्लडबाजीही खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिला.‘लॉकडाऊन’च्या दहाव्या दिवशी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. कोरोना लढाईचा भाग म्हणून रविवारी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घरातील वीज बंद करावी. त्यानंतर घरात, बाल्कनी किंवा टेरेसवर जाऊन दिवे, मेणबत्ती किंवा टॉर्च लाईट नऊ मिनिटे प्रज्वलित करावीत, असे आवाहन मोदी यांनी देशवासीयांना केले आहे. तसेच यावेळी कोणीही घराबाहेर येऊ नये, घरात राहूनच हे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.परंतु ‘जनता कर्फ्यू’वेळी नागरिक सायंकाळी थाळ्या वाजवत बाहेर पडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा अनुभव ताजा असल्याने उद्याही असाच प्रकार नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपापल्या घरातच थांबावे. कोणीही घरातून बाहेर पडून रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करू नये. अशी हुल्लडबाजी केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला.