राम मगदूम
गडहिंग्लज- देशाच्या सीमेवर अतिरेक्यांबरोबर दोन हात करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या आजी-माजी सैनिकांनी आता गावकऱ्यांच्या जीविताच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली आहे. गावच्या ‘पांढरीत’ कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ते आपल्या वेशीवर २४ तास खडा पहारा देत आहेत. त्यामुळे ‘हरळी खुर्द’ येथील आजी-माजी सैनिकांचे गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यात विशेष कौतुक होत आहे.गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर २८२८ लोकसंख्या आणि अवघे ५५०-६०० उंबरे असणाऱ्या या गावात एकूण ९४ आजी-माजी सैनिक आहेत. गावासाठी कांही तरी करण्याची जिद्द उराशी बाळगून ते एकत्र आले आहेत. त्यासाठी त्यांनी आपली संघटना स्थापन केली आहे.१९७१ च्या भारत-पाक युद्धात इथले जवान शामराव रायाप्पा ऐवाळे हे शहीद झाले. मातंग समाजातील त्या जवानाच्या स्मरणार्थ त्यांनी वैयक्तिक वर्गणी काढून गावच्या वेशीवर ६ लाखाची स्वागत कमान उभारली आहे.‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी आठवड्यापूर्वी सरकारने लॉकडाऊनचा आदेश अचानक जारी केला. त्यावेळी त्यांनी संघटनेतर्फे आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि मोठ्या गावातून किराणा माल खरेदी करून गावात आणला. त्यावर कोणताही नफा न मिळविता आणलेल्या किमतीत तो ग्रामस्थांना घरपोच केला.दरम्यान, प्रांताधिकाऱ्यांनी गावबंदीचा हुकूम जारी केल्यानंतर त्यांनी उत्स्फूर्तपणे ग्रामपंचायतीच्या परवानगीने गावच्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी संघटनेकडे घेतली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, रस्त्यावर फिरणाऱ्या होम क्वॉरंटाईनना घरात बसविणे व प्रबोधनाचे कामदेखील ते मनापासून आणि आनंदाने करीत आहेत. त्यांनी सैनिकी गणवेशात आळीपाळीने गावच्या वेशीवर २४ तासांचा जागता पहारा ठेवला आहे.संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राजे, उपाध्यक्ष जयसिंग पाटील, खजिनदार संजय पाटील, सचिव शशीकांत चौगुले, सिद्राम कानडे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, बबन चौगुले, सुरेश पाटील आदींच्या नेतृत्वाने हे काम सुरू आहे.
संकटकाळी गावासाठी उत्स्फूर्तपणे झटणाऱ्या सैनिकांमुळे ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली आहे. त्यांच्या अनमोल कामगिरीबद्दल ग्रामस्थ सदैव कृतज्ञ राहतील.- बाळकृष्ण परीट, माजी सरपंच.
१ हजार मास्क वाटणारगावातील गरजूंना १ हजार मास्क संघटनेतर्फे मोफत वाटण्याचा निर्णय सैनिकांनी घेतला आहे. त्यासाठी कापडी मास्क शिवण्याचे काम त्यांनी गावातील महिलांना दिले आहे. त्यातून कांही महिलांना रोजगारही मिळाला.