कोल्हापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध वाढवले आहेत. या वातावरणात ‘गोकूळ’ची निवडणूक घेऊ नये, असा काही मतप्रवाह पुढे येत आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असून दुसरी लाट सुरू झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. राज्यात रोज २५ हजार रुग्ण सापडत असून कोल्हापुरातही रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाल्याने राज्य शासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थिती निम्यावर आणण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. अशा वातावरणात ‘गोकूळ’ची निवडणूक घेणे कितपत योग्य आहे, यावर चर्चा सुरू आहे. उमेदवार, त्यांचे समर्थकांच्या गाठीभेटीसह इतर बैठका होत असल्याने गर्दी होते. यातून निवडणूक लांबणीवर टाकण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.
इतर संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर
इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत लांबणीवर टाकल्या होत्या. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने निवडणुका घेणे अशक्य आहे. यासाठी निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकल्या जाण्याची दाट शक्यता आहे.