कोल्हापूर :गेल्या चोवीस तासांत नवे २१८ रुग्ण आढळले तर सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये कोल्हापूर शहरातील चाैघांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे २१८ रुग्णांची भर पडली असली तरी उपचार घेऊन बरे झालेल्या ३६४ रुग्णांचा डिस्चार्ज झाला आहे.
नव्या रुग्णसंख्येत कोल्हापूर शहर ३६, करवीर तालुका - ४०, हातकणंगले - ३७, अशा रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सानेगुरुजी वसाहत-२, रिंगरोड आपटेनगर, नागाळा पार्क प्रत्येकी एक रुग्णांचा व इचलकरंजी व पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय चिकोडी तालुक्यातील कोरोची येथील ४४ वर्षीय महिलेचाही सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.