कोल्हापूर : होम क्वारंटाईन पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच शहरात कोरोना संसर्ग वाढला आहे. संबंधित रुग्ण घरातून बाहेर फिरत असतात. अशांवर महापालिकेची कोणताच वचक राहिलेला नाही. परिणामी रुग्णसंख्या वाढत आहे. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली असल्याचा आरोप शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.यामध्ये म्हटले आहे की, लक्षणे काही दिसत नाहीत, अशा कोरोना रुग्णांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन होण्यास सांगितले जाते. त्यांचे संपूर्ण अलगीकरण झाल्याचे दिसत नाही. हे रुग्ण तितके डिस्टन्स पाळत नाहीत. यांच्यासाठी केलेल्या स्वयंपाकाची भांडी, त्यांचे कपडे, अंथरूण, प्रसाधनगृह यांचे विलगीकरण होत नाही. घरातील इतर लोकही त्याचा बराचसा वापर करतात. रुग्ण पाच-सहा दिवसांनंतर घरात व परिसरात वावरताना दिसतो.
यामुळे संपर्कातील लोकांनाही त्याची बाधा होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. बरीच मंडळी स्राव देऊन आल्यानंतर क्वारंटाईन न होता कुटुंबात व समाजात बिनधास्त फिरत असतात आणि नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सगळ्यांची धावपळ होऊन परिस्थिती गंभीर बनते.याबाबत प्रशासनाचे काहीच नियोजन दिसत नाही. गांभीर्याने घेतले जात नाही. याबाबत काय व कशा प्रकारे नियोजन केले हे जाहीर करावे, अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, अंजुम देसाई, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे यांनी केली आहे.